उत्तरक्रिया (पानिपत पश्चात)

स्रोत: फेबु पराग नेरुरकर

पानिपतच्या युद्धामध्ये हिंदूंची एक पिढी खर्ची पडली. राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराने आपले योगदान दिले. पानिपत घडण्यास जी काही कारणे होती. त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे 'नजीबखान रोहिला'. यानेच अब्दालीला हिंदूंच्या परिपत्यासाठी अब्दालीला अफगाणिस्थानाहून बोलावले होते. नानासाहेबांनी दत्ताजी शिंदेंना लिहिलेल्या एका पत्रात या नजीबचा कालसर्प असा उल्लेख केलेला आढळतो. याच नजीबामुळे हजारो हिंदू सैनिक धारातीर्थी पडले. हिंदूंना भळभळती जखम देऊन नजीबखान मात्र आपल्या किल्यात सुरक्षित राहीला.

इकडे माधवराव पेशवे गादीवर आले. १७६३ साली झालेल्या राक्षसभुवन लढाईत हिंदूंनी निजामाला अस्मान दाखवले. गोदामाईने वाट अडवल्याने निजाम वाचला अन्यथा निजामशाही त्याच दिवशी संपली असती. माधवराव आणि निजाम यांच्यामध्ये एक तह झाला ज्यामध्ये निजामाला ६२ लक्ष चा प्रदेश हिंदवी साम्राज्याला द्यावा लागला. पुढच्याच वर्षी माधवरावांनी दक्षिणेतल्या हैदरला पराभूत केले.

१७६७ साली पुन्हा हैदरने डोके वर काढले. माधवरावांनी पुन्हा त्याचा बिमोड केला. दक्षिणेत हिंदवी साम्राज्य पुन्हा एकदा मजबूत झाले.

पानिपतच्या युद्धानंतर कमी झालेली हिंदवी साम्राज्याची ताकद आणि वचक मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, नाना फडणवीस आणि माधवराव पेशवे यांनी पुनःप्रस्थापित केली.

एक दिवशी बातमी येऊन धडकली.. हिंदूंचा मुख्य शत्रू नजीबखान ३० ऑक्टोबर १७७० रोजी मरण पावला. आपल्या शत्रूची खांडोळी करता आली नाही, याचे शल्य माधवराव पेशव्यांच्या मनात कायम होते.

स्वतः माधवराव या मोहिमेचे नेतृत्व करणार होते पण त्यांना क्षयाने ग्रासले होते. विसाजीपंत बिनीवाले, महादजी शिंदे यांचेवर मोहिमेची जबाबदारी आली. त्यांनी लगेचच आपला मोर्चा 'रोहीलखंडाकडे' वळवला.

नजीबाचे मुख्य ठाणे असलेल्या 'पत्थरगड' किल्ल्यालाच हिंदूंनी वेढा घातला. नजीबचे मुलगा झाबताखानचे धाबे दणाणले. हिंदूंच्या ताकदीला तोंड देण्याएवढी शक्ती त्याच्याकडे नव्हती. जमेल तेवढ्या मौल्यवान गोष्टी आणि बायकापोरांसह झाबताखान किल्ला सोडून रात्रीच्या अंधारात पळून गेला. मग काय किल्ल्यामध्ये हाहाकार उडाला.

एक सैन्य तुकडी झाबताखानाच्या मागावर पाठवून महादजी शिंदेंनी किल्ल्यावर हल्ला केला. किल्ल्याच्या आत असलेल्या बायका पोरं सोडली तर समोर दिसेल त्या व्यक्तीला कापून काढले. प्रचंड लांडगेतोड केली. साऱ्या किल्ल्यात रक्ताचे पाट वाहू लागले. त्याच वेळी एक गोष्ट घडली. हिंदूंच्या ऱ्हासास कारणीभूत ठरलेल्या नजीबखानाचे थडगे किल्ल्यात असल्याची माहिती मिळाली. झाले. त्याच्या थडग्यासमोर सारी सरदार मंडळी जमली. कुदळ, फावडे, पहारी हातात जे येईल त्या अवजाराने हिंदूंनी नजीबाचे थडगे फोडले. विसाजीपंत तर त्याच्या कबरीत उतरले आणि त्याची हाडे उधळत, राख अंगाला फासत त्या थडग्यावर थयथया नाचू लागले.

सुडाने पेटलेल्या हिंदवी साम्राज्याच्या सैनिकांनी पत्थरगडाची राखरांगोळी करून टाकली. महादजी बाबांनी तर जमिनीच्या वर २ इंच दिसणारे प्रत्येक बांधकाम तोफ लावून उडवून देण्याची आज्ञा दिली होती. संपूर्ण पत्थरगड धुळीस मिळाला. किल्ल्यातील लोकांनी हिंदूंच्या भीतीने खंदकात सारी मालमत्ता टाकून दिली होती. हिंदवी साम्राज्याच्या सैनिकांनी पाटाद्वारे सारे पाणी खंदकातून काढले आणि सारी मालमत्ता हस्तगत केली.

पानिपताच्या पराभवामुळे पुण्यात दुःखाची छाया पसरली होती त्याच पुण्यात या विजयी मोहिमेनंतर अभूतपूर्व असा दीपोत्सव साजरा करण्यात आला. माधवराव पेशव्यांनी आपल्या पराक्रमी सरदारांचा भव्य सन्मान केला. नजीबाचे थडगे फोडणाऱ्या विसाजी पंतांवर माधवरावांनी सुवर्णफुले उधळली. पानिपतात झालेला दुर्दैवी पराभव पुसला जावून हिंदवी साम्राज्याचा जरीपटका आसमंतात पुन्हा एकदा डौलाने फडकू लागला. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "उत्तरक्रिया" या आपल्या पुस्तकातून हिंदूंनी घेतलेल्या या प्रतिशोधाची महती विदित केली आहे.

पानिपतच्या पराभवाचा कलंक हिंदूंनी धुवून टाकला. हिंदवी साम्राज्याचा पराक्रम उत्तरेत निनादू लागला. कुठे पुणे आणि कुठे पत्थरगड?.. पण या भीमथडी तट्टानी गंगा- यमुना यांचा प्रदेश आपल्या पराक्रमाने पावन करवला. रोहिल्यांचा त्यांच्याच प्रदेशात घुसून पराभव करणे सोपे नव्हते. पण हिंदू सूडाला पेटले की काय होत याची साक्ष म्हणजे हा रोहीलखंडातला विजय आहे.

आपल्या सर्वात मोठ्या शत्रूचे अस्तित्वच हिंदूंनी कायमस्वरूपी नष्ट करून टाकले. आजही नजीबखानचे थडगे किंवा पत्थरगड किल्ला अस्तित्वात नाही. जे काही सापडते, ते केवळ भग्न अवशेषांच्या रुपात.

शेवटी इतकंच म्हणू इच्छितो की..

हम प्रेम शान्ति के संवाहक, हम शौर्य शक्ति के सिंधु है, स्वधर्म हमारा स्वाभिमान, है गर्व हमें हम हिन्दू है।