पानिपत युद्ध तृतीय ३
स्रोत: पेशवे गण (फेबु , व्हॅप), फेबु पराग नेरुरकर , युटू पानिपत - विजयादशमी Maratha History 👍🏻
स्थळ: पानिपत, हरयाणा , कर्णाल जिल्हा ( दिल्लीच्या वायव्येस सु. ८५ किमी. वर दिल्ली-अंबाला हमरस्त्यावर )
मूळनाव: पांडूप्रस्थ
काळ: १७६० - १७६१ (युद्ध - १४ जानेवारी १७६१)
पात्र: पेशवे वि. अफगाण अहमदशाह अब्दाली (आणि प्रमुख कारण नजीबखान रोहिला)
पेशवे: भाऊसाहेब, विश्वासराव, मल्हारराव होळकर, समशेर बहाद्दूर, इब्राहिम खान गार्दी (तोफखाना)
अफगाण: अहमदशाह अब्दाली, नजीबखान रोहिला, शुजाउदौला, शाहवली खान
अठराव्या शतकाच्या आरंभी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर दक्षिण प्रायः निर्वेध झाली. त्यानंतर उत्तरेस दिल्ली दरबारात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित करावयाचे हे मराठी राज्याचे जणु सूत्रच होऊन बसले. ‘चलो दिल्ली’ या सूत्रानुसार पहिल्या बाजीराव पेशव्याने नर्मदा ओलांडून गुजरात, माळवा, बुंदेलखंड या भागांत संचार केला. त्याने व त्याच्या फौजांनी मोगली राजधानी दिल्ली गाठली. दक्षिणच्या सहा सुभ्यांची सुखत्यारी मागून तो स्वस्थ बसला नाही. त्याने नर्मदा ते चंबळपर्यंतच्या मुलखाची मागणी केली. १७४१ मध्ये या जहागिरीच्या सनदा बाळाजी बाजीराव पेशव्यास मिळाल्या. पुढील दहा वर्षांत राजस्थान, आग्रा, गंगा-यमुनेचा दुआब आणि बंगाल येथील राजकारणात मराठ्यांनी प्रवेश मिळविला.
पानिपत पार्श्वभूमी
अहमदशाह अब्दाली १७४८
अशा रीतीने मराठे मोगल बादशाहीची सूत्रे हातात घेत असता, त्यांना एक नवाच जबरदस्त शत्रू निर्माण झाला. अहमदशाह अब्दाली १७४८ पासून हिंदुस्थानवर स्वाऱ्या करू लागला होता. त्याने १७५१ च्या अखेरीस लाहोरपर्यंत येऊन पंजाबचा काही भाग बळकाविला. आता हा राजधानीवर येतो की काय, या भीतीने बादशाहाने त्याचा प्रतिकार करण्याचे वजीरास सुचविले आणि वजीराने १७५२ च्या मार्च महिन्यात मराठे सरदारांशी करारनामा केला. त्यांच्यावर संपूर्ण बादशाहीचे संरक्षण सोपविले गेले...!!
अब्दालीने १७५७ मध्ये खुद्द राजधानीच गाठली. दिल्ली, आग्रा, मथुरा, वृंदावर लुटून अपार संपत्ती त्याने मिळविली आणि पंजाबात आपले अधिकारी नेमले. त्याची पाठ फिरते न फिरते तोच राघोबाचे हाताखाली मराठ्यांच्या फौजा चालून येऊन त्यांनी अबदालीची ठाणी उठविली आणि बादशाहाच्या वतीने पंजाबचा बंदोबस्त आरंभिला पण अबदाली स्वस्थ बसणारा नव्हता.
१७५९ च्या नोव्हेंबरात मोठ्या फौजेनिशी तो पंजाबात घुसला आणि मराठ्यांची ठाणी त्याने हस्तगत केली. रोहिल्यांना घेऊन दिल्लीनजीक शिंद्यांच्या फौजेस त्याने गाठले. या लढाईत दत्ताजी शिंदे गारद झाला आणि शिंद्यांच्या फौजेने रणातून पळ काढला. मल्हारराव होळकर मदतीस धाऊन आले पण आता वेळ निघून गेली होती. होळकरांचा गनिमी कावा अबदालीपुढे कुचकामी ठरला.
पेशव्यांकडे बातमीदारांची पत्रे येऊ लागली की, वेळ आणीबाणीची आली आहे हिंदुस्थानातील आपला अंमल उठला, अबदाली दिल्लीस येऊन पोहोचला आणि त्याने पंजाब, दिल्ली प्रदेश व्यापला. दुआब, आग्रा व राजस्थानातील सर्व राजेरजवाड्यांकडे त्याचे वकील रवाना झाले. आतापर्यंत केलेली सर्व कमाई फुकट गेली. रोहिले अबदालीस सामील झाले. शिंदे-होळकरांचा पाडाव झाल्यापासून आपल्या फौजांनी धीर सोडला आहे आणि शत्रूला गर्व चढला आहे. उत्तरेत जी बिकट समस्या निर्माण झाली, त्यांची चर्चा करण्याकरिता पेशव्याने आपल्या सरदारांना बोलाविले. एक आठवडाभर ऊहापोह होऊन असे ठरले की, सदाशिवरावभाऊने उत्तरेत जाऊन शत्रूचा परिहार करावा.
१६ मार्च १७६० उत्तरायण
ह्या दिवशी भाऊ विश्वासरावासह उत्तरेची वाट चालू लागला.१३ हजार निवडक हुजरात, १२ हजार सरदारांची फौज, इब्राहीमखान गारदीने तयार केलेले पाश्चात्त्य पद्धतीने लढणारे ८ हजार पायदळ आणि जंगी तोफखाना घेऊन तो निघाला. १२ एप्रिलला विश्वासरावासह त्याने नर्मदा ओलांडली आणि उत्तरेतील हिंदू, राजपूत, जाट, बुंदेले तसेच राजेरजवाडे आणि मुसलमान नबाब, अमीर-उमराव या सर्वांना बादशाहीच्या रक्षणार्थ एकत्र येण्याचे आवाहन केले.
दिल्ली दरबारात मराठ्यांना अनुकूल असा एक पक्ष होता. मराठ्यांच्या मदतीने बादशाही चालवावी असे या पक्षाचे मत होते. पण मराठ्यांच्या उत्तरेतील राजकारणामुळे तसेच राजपूत, जाट यांच्या भांडणांत पडल्यामुळे दिल्ली दरबारात मराठ्यांना विरोध वाढला व द्वेषप्रेरित होऊन निजाम, जयपूरचा माधोसिंग, जोधपूरचा बिजेसिंग, नजीबखान व त्याचा गुरुतुल्य सहकारी शाह वलीउल्लाह यांनी अबदालीने मराठ्यांची खोड मोडावी, म्हणून त्यास निमंत्रण दिले.
मराठ्यांशी सहकार्य करण्यास कोणी पुढे येईना. राजस्थान, बुंदेलखंड येथील राजे, नजीब सोडून रोहिल्यांपैकी इतर सरदार व अयोध्येचा शुजाउद्दौला आपल्या साह्यास येतील, अशी खोटी आशा भाऊस वाटत होती पण सर्व फोल ठरले, त्याला एकाकी शत्रूला तोंड द्यावे लागले. परख्या अबदालीला एतद्देशीय मदतनीस मिळाले पण अबदाली काही झाले तरी येथे राहणार नसल्याने शेवटी आपणच सत्ताधारी होऊ, उलट मराठे सत्ताधारी झाल्यास आपणावर बंधने येतील, या विचाराने भाऊच्या मदतीस कोणी धाऊन आले नाहीत.
वाटेत जमीनदारांचे दंगे व अकाली पाऊस, या कारणाने चंबळ नदी ओलांडून आग्र्यास पोहोचण्यास भाऊच्या फौजेस तीन-साडेतीन महिने लागले.
आग्र्याच्या दक्षिणेस १८ जूनला शिंदे-होळकरांच्या भेटी झाल्या. भाऊचा पहिला बेत आग्र्याजवळ यमुनापार करून अंतर्वेदीत उतरून शत्रूस गाठावयाचा होता पण पाऊसकाळ लवकर सुरू झाला आणि यमुना दुथडी भरून चालली. बोटींचा पूल बांधून नदी ओलांडावयाचा विचार भाऊस सोडून द्यावा लागला. १४ जुलैस फौजा आग्र्यास पोहोचल्या. २१ तारखेस एक तुकडी राजधानी दिल्ली काबीज करण्याकरिता निघाली. २ ऑगस्टला राजधानीचे शहर मराठ्यांच्या ताब्यात आले.
दोन-चार वर्षे चाललेल्या दोन्ही फौजांच्या हालचालीत राजधानी आणि भोवतालचा प्रदेश अगदी धुऊन निघाला होता दंग्यामुळे साल मजकूरचा ऐवज येईना संस्थानिक खंडणी देईनात सावकार परागंदा झाले कर्ज मिळेनासे झाले आणि इकडे भाऊचा खर्च तर बेसुमार वाढला. वाटाघाटीतून काही निष्पन्न होईना आणि नदीचे पाणी उतरण्यास अद्याप महिना होता. फौजेची तर आबाळ होतच होती.
कुंजपुरा कूच (दिल्लीपासून १२० किमी. उत्तरेस, यमुनेच्या पश्चिम किनार्यावर)
ही कोंडी फोडावयाची कशी याचा विचार करता, दिल्लीपासून १२० किमी. उत्तरेस, यमुनेच्या पश्चिम किनार्यावर असलेल्या अबदालीच्या कुंजपुरा ठाण्यावर हल्ला करण्याचे भाऊने ठरविले. कुंजपुरा लष्करी दृष्ट्या महत्त्वाचे ठाणे होते. अफगाण फौजांच्या उपयोगासाठी कुंजपुर्याच्या किल्ल्यात दहा हजार खंडी धान्य, चार-पाच हजार घोडी, दारूगोळा इ. सामग्री साठविण्यात आली होती.
८ ऑक्टोबर रोजी मराठी फौजांनी दिल्ली सोडली. १७ तारखेस इब्राहीमखानाच्या तोफांच्या मार्याने किल्ल्याच्या तटास खिंडार पाडले व त्यातून मराठी फौज आत घुसली. तेथे झालेल्या धुमश्चक्रीत मोमीनखान व किल्लेदार नजाबतखान आणि चार हजार रोहिले मारले गेले. ठाण्यांतील सर्व सामग्री मराठ्यांच्या ताब्यात आली. विशेषतः धान्याची कोठारे हातात आल्यामुळे मराठी फौजेचा हुरूप वाढला. दुसर्या दिवशी मराठा छावणीत दसरा मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला.
पीछाडीस शत्रू नदी ओलांडण्याचा प्रयत्न करील, असा अंदाज भाऊस आला नव्हता असे नाही पण पुरामुळे तो एवढ्या लवकर नदी पार करील असे वाटले नाही. पण अबदाली काही सामान्य शत्रू नव्हता. मराठे उत्तरेकडे गेले, त्यांनी आपले मोक्याचे भक्कम ठाणे काबीज केले. काही न करता हे स्वस्थपणे पाहणारा तो नव्हता. नदी पार करावयाचे त्याने ठरविले. बागपताजवळ त्याने एक उतार शोधून काढला आणि २३ ऑक्टोबरपासून त्याचे अफगण सैन्या महाप्रयासाने दुआबातून नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरू लागले. या ठिकाणी शत्रूस अटकाव करण्याकरता मराठ्यांची चौकीसुद्धा नव्हती.
नदीचे जोराचे वाहते पाणी, चिखल, दलदल यास न जुमानता व सु. १५०० सैनिक गमावून ३ दिवसांत सर्व सैन्य उतरून यमुनेच्या पश्चिम तीरास आले
शत्रूने बागपतानजीक नदी ओलांडली, ही खबर कुरुक्षेत्राच्या मार्गावर असलेल्या भाऊस २५ ऑक्टोबरला मिळाली. २८ ऑक्टोबर रोजी दोन्ही फौजांच्या आघाडीची चकमक होऊन दोन्ही फौजा मागे सरल्या. पानिपत गावाभोवती तोफखाना पसरून भाऊने छावणी केली. अबदालीने त्याच्या दक्षिणेस ५-७ किमी. वर आपला मुक्काम ठोकला...!!
दोन्ही सैन्यांनी एकमेकांचा परतीचा जाण्याचा रस्ता रोखला. भाऊचे पायापासून दळणवळण तुटले. मराठ्यांच्या सैन्याला कुंजपुरा (पानिपतच्या उत्तरेस यमुनेच्या पश्चिम किनार्यावर) येथून रसद चालू होती तसेच अब्दालीला अजूनही दुआबाद (पानिपतच्या दक्षिणपूर्व (आग्नेय) यमुनापूर्वकिनारा ) येथून मिळत होती. अब्दालीची रसद कापणे गरजेचे होते. भाऊ साहेबांनी गोविंदराव बुंदेले यांना या संदर्भात अनेक पत्रे लिहिली होती. पण त्यांना हे काम पूर्णत्वास नेता येत नव्हते. तसेच गोपाळराव बर्वे हे शुजाउदौला (पानिपतच्या दक्षिणपूर्व (आग्नेय) यमुनापूर्वकिनारा) याच्या कडून येणारी रसद रोखू शकत नव्हते. रसद तोडली तर अब्दाली तहासाठी पुढे येईल किंवा युद्धात माघार घेईल अशी योजना होती.
७ नोव्हेंबर १७६० मोठी चकमक
नजीब खानाने डाव्या बाजूने हल्ला केला. त्याच्या जोडीला मागून शुजाचे सैन्य सुद्धा आले. परंतु मराठ्यांच्या खंदक व तोफा यांच्या माऱ्यात ४०० रोहिले मारले गेले. अंधाराचा फायदा घेत शत्रूचे १५० घोडे मराठ्यांना मिळाले. नोव्हेंबर संपता संपता पैशाचा तुटवडा जाणवू लागला.
त्यानंतर एक दिवस होळकरांनी शाहवली खान ह्याच्या छावणीवर जोरदार हल्ला केला. छावणी मोडून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होते. शाहवलीचे २००० व मराठ्यांचे ८०० लोक मारले गेले. इतर अफगाण सैन्य मदतीला आल्याने त्यांना माघार घ्यावी लागली.
याच दरम्यान नजाबत खानाचा मुलगा दिलावर खान याने कुंजपुरा पुन्हा जिंकून घेतले. त्यामुळे मराठ्यांची तिथली रसद बंद झाली. त्यामुळे भाऊसाहेबांनी विंचूरकर यांना चारा व रसद मिळवण्यासाठी पानिपतच्या उत्तरेला पाठवले. त्यांनी गर्नाला (कुंजपुराच्या वायव्येला) इथपर्यंत जाऊन व्यवस्था सुरु केली.
या सर्व काळात अनेक चकमकी उडत होत्या. मराठे छापे मारून जनावरे व तोफा चोरून आणत होते.
२२ नोव्हेंबर १७६० चंद्रग्रहण त्या दिवशी शाहवली सैन्यासह पानिपतच्या नैऋत्येला मराठ्यांच्या छावणीच्या असलेल्या विहिरीजवळ गस्त घालत होता. ते बघून जनकोजी शिंदे ह्यांनी त्यांच्या वर छापा घातला. त्याने ती सर्व तुकडी कापून काढली. अकस्मात झालेल्या हल्ल्याने शाहवली स्तिमित झाला. त्याने त्वरित माघार घेतली. उरलेल्या पळणाऱ्या सैन्याच्या मराठ्यांनी पाठलाग केला. परंतु शत्रूची छावणी जवळ आल्यावर त्यांना साहाय्य आल्यामुळे जनकोजींनी परतीचा निर्णय घेतला. परंतु या प्रसंगामुळे मराठ्यांना पलीकडे जाण्याचा एक मार्ग दिसला. शत्रूचे दिड हजार सैन्य जखमी झाले.
इथे महत्वाचे म्हणजे बळवंतराव मेहेंदळे यांनी जनकोजीच्या साहाय्यास येणे अपेक्षित होते ज्यामुळे शत्रूच्या छावणीत शिरून मार्ग मोकळा करता आला असता. परंतु ते वेळेत न आल्यामुळे ते शक्य झाले नाही.
जनकोजीच्या छाप्यामुळे अब्दाली गोटात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच त्याला नदीपलीकडील रसदीचा प्रश्न सोडवायचा होता. त्यामुळे नोव्हेंबर अखेरीस त्याने पूर्वेला यमुनानदी जवळ आपली छावणी हलवली.
७ डिसेम्बर १७६० छाछपूर मराठी सैन्याने येथे येऊन अब्दालीच्या छावणीसमोर रणखांब रोवला. त्यांनी त्यांच्या तोफा तिथे उभ्या केल्या. त्या दिवशी संध्याकाळी परतत असताना एका बाजूने नजीब व दुसऱ्या बाजूने शुजाच्या सैन्याने छापा घातला. शुजाने उजव्या बाजूने होळकरांच्या सैन्यावर हल्ला चढवला. ह्या अकस्मात हल्ल्याने त्यांचे सैन्य मागे फिरू लागले. तेव्हा होळकरांनी आपल्या सैन्याला 'तुम्ही सगळे पळ काढा आणि आता मी एकटा लढून मरतो' असे सुनावले. तेव्हा त्यांचे सैन्य माघारी फिरलं व त्यांनी कडवा प्रतिहल्ला चढवला. त्यामुळे शुजाचे सैन्य गडबडून छावणीकडे परत फिरले.
ती परत आलेली तुकडी शुजा सह दुसऱ्या (डाव्या) बाजूला नजीबला जाऊन मिळाली व त्यांनी इब्राहिम गार्दी यांच्या तोफखान्यावर हल्ला चढवला. त्यांनी खंदकापर्यंत रेटून मागे नेले. नजीब व त्याचा भाऊ आणि काका आघाडीवर लढत होते. त्यातला एक मारला गेला आणि नजीबच्या दंडाला गोळी लागली.
इब्राहिम आणि बळवंतराव मेहेंदळे यांनी पराक्रमाची शर्थ केली. मराठ्यांचे पारडे जड होत चालले होते. परंतु या विजयी प्रसंगात एक दुर्दैवी गोष्ट घडली. आघाडीवर लढत असलेल्या मेहेंदळेंना एक गोळी छातीवर लागली. आणि त्या क्षणी ते गतप्राण झाले. त्यांचे शिरच्छेद करण्यास रोहिला सैन्य पुढे सरसावले. त्यावेळी अकलूजचे खंडेराव नाईक निंबाळकर धाडसाने पुढे येऊन रोहिल्यांना अटकाव केला. मराठी सैन्याने त्यांचे प्रेत आपल्या छावणीत आणले. मेहेंदळ्यांच्या मृत्यूने मराठी छावणीला मोठा धक्का बसला. समस्त मराठा छावणी दुःखात बुडाली.
पुढे डिसेम्बर महिन्यात बुंदेले त्यांना दिलेल्या रसदतोडीच्या मोहिमे वर असताना शत्रूने लबाडी करून भक्ष केले. त्याआधी त्यांना मिळालेली रक्कम त्यांनी दिल्लीत असलेल्या नारो शंकर यांच्याकडे पाठवून दिली होती. त्यांचे शिर छावणीत मिरवून अब्दालीने २१ डिसेंबरला भाऊसाहेबांकडे रवाना केले. नियतीने त्यांना हा दुसरा धक्का दिला.
बुंदेल्यांच्या निधनामुळे दक्षिणेकडून होणारी रसद जवळ जवळ बंद झाली. तसेच पानिपतच्या उत्तरेला कुंजपुरा शत्रूकडे गेल्यामुळे पुढे गर्नाला येथून होणाऱ्या रसदीवर सुद्धा बंधने आली.
बुंदेले यांनी पाठवलेले काही धन दिल्लीतील नारो शंकर यांच्या कडे होते. त्यातील थोडी रक्कम भाऊ साहेबांकडून आलेल्या माणसाकडे त्यांनी दिली व ती सुखरूप भाऊ साहेबांकडे पोहोचली.
२ जानेवारी १७६१ रोजी पराशर या सरदारामार्फत अन्य काही रक्कम पाठवली. त्यांच्या सोबत ३०० स्वार होते. दिल्लीहून निघालेले हे सर्व रात्री पानिपतजवळ पोचले. तिथे त्यांना एक छावणी दिसली. ते पाहून ते घोड्यावरून खाली उतरले. तेथे गेल्यावर लवकरच त्यांच्या लक्षात आले की ते मुघल छावणीजवळ थांबले आहेत. तेथे एकच गोंधळ उडाला. ते कसेबसे लढत झगडत तेथून पळून भाऊंकडे आले. हा प्रकार ६ जानेवारीला घडला. परंतु या घटनेने भाऊना कळले की अब्दालीने छावणी पुन्हा दिल्ली पानिपत मार्गावर (यमुने पासून दूर (पूर्वीच्याच जागी किंचित दक्षिणेला)) हलवली होती. ही हालचाल त्याने ३० डिसेंबरलाच केली होती. ह्यामुळे मराठ्यांचा दिल्लीशी होणारा संपर्क तुटला.
ह्या रसद तुटवड्यामुळे मराठ्यांनी पानिपत गावाजवळचा प्रदेश लुटायला सुरुवात केली. यामुळे सैन्य आणि प्राणी यांची उपासमार होऊ लागली. सैन्याने भाऊंना विनंती केली की भुकेने मरण्यापेक्षा युद्ध करून मरू. तसेही शत्रूने सर्व बाजूने घेरल्याने अब्दाली तह करेल याची तीळमात्र शक्यता नव्हती. शेवटी त्यांनी युद्धाचा निर्णय घेतला.
१० - १४ जानेवारी १७६१ १० जानेवारी रोजी मकर संक्रांत होती (आजपासून (~ २०००) ३०० वर्षांपूर्वी मकर संक्रांत १० जानेवारीस येत असे). त्यानंतर युद्धसंबंधी खलबते सुरु झाली. कोणती युद्धनीती व्यूहरचना वापरावी, सर्व योजना, आखणी सुरु झाली. शेवटी सर्वानुमते गौल पद्धतीनुसार (भाऊंनी ही उदगीरच्या लढाईत प्रत्यक्ष अनुभवली होती) लढण्याचे ठरले. १३ जानेवारी ला सर्व योजना निश्चिती झाली. प्रत्येक सरदाराने ती आपापल्या तुकडीला सांगितली.
अब्दालीने चंद्रकोरी प्रमाणे त्याच्या सैन्याची व्यूह रचना केली. पुढील बाजूस त्याने सर्व प्रमुख सरदार व त्यांची पथके ठेवली. तो स्वतः मात्र सैन्याच्या मागच्या बाजूला होता.
अखेर १४ जानेवारी रोजी दोन्ही बलवान पक्ष या महान युद्धासाठी एकमेकासमोर उभे ठाकले. सकाळपासून दोन्ही पक्षात तुंबळ युद्ध सुरु झाले. दोन्ही पक्ष अत्यंत त्वेषाने लढत होते. १२ वाजले, २ वाजले. तेवढ्यात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. अवघ्या २० वर्षाचे असलेले सेनानायक विश्वासराव लोकांना उत्तेजन देत पुढे जात होते. अकस्मात १ गोळी येऊन त्यांना लागली. त्याक्षणी ते घोड्यावरून पडून गतप्राण झाले. भाऊसाहेब जवळच लढत असल्याने त्यांना ही गोष्ट लक्षात आली. ते यामुळे अत्यंत क्रोधीत झाले. त्यांनी अत्यंत त्वेषाने लढून पुढे अब्दालीकडे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु शत्रूची फौज सतत त्यांना रोखत होती. लढाईच्या धुमश्चक्रीत मुकुंद शिंदे यांनी भाऊंना निघून जाण्याबद्दल सुचवले. साहजिकच भाऊंनी ते ऐकले नाही उलट त्यांना सांगितले की 'या रणांगणी मागे फिरणे नाही'. दुपारपर्यंत मराठ्यांचे पारडे जड होते.
परंतु विश्वासराव पडल्याची बातमी मराठी सैन्यात पोचली त्यामुळे प्रचंड अफवा पसरल्या. मराठे सैन्यात असलेल्या अफगाण तुकडीने बुणगे लुटायला सुरवात केली, जो तो जीव वाचवण्यासाठी पळू लागला. यामुळे मराठ्यांचा निभाव आता लागणार नाही असे समजून उजव्या बाजूला असणारे होळकर आणि त्यांचे प्रमुख सरदार यांनी रणांगणातून माघार घेतली.
मध्यभागी असणारे भाऊ अजूनही प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. त्यांना माहित होते की अब्दालीला गाठून त्याला जेरबंद केले तर हे युद्ध सहज आपल्या बाजूने फिरेल. परंतु मराठ्यांचे बरेचसे सैन्य निघून गेल्यामुळे असलेले अफगाण सर्व सैन्याने भाऊंवर आपली शक्ती एकवटली. त्यांच्याच जोडीला अजून ताज्या दमाचे किजलबाज ( गुलाम तुर्की नोकरांचे सैन्य ) पाठवले. यामुळे शत्रू सैन्याची संख्या व बळ यापुढे मराठे सैन्याची जबरदस्त नामुष्की झाली. बुणग्यासोबत परतताना नाना फडणवीसांना मोघलांच्या गराड्यात पडलेल्या भाऊंचे ओझरते दर्शन झाले. चहूबाजूने पठाण सैन्याने भाऊ आणि जनकोजी यांना घेरले.
हर हर महादेव च्या अखेरच्या गर्जना रणांगणावर घुमल्या. पठाणसैन्याच्या त्या कृष्ण छायेत भाऊंचा तेजस्वी तारा अस्त पावला.
या दिवशी भारतमातेच्या रक्षणार्थ झेपावलेल्या व या भीषण युद्धात कामी आलेल्या शूरवीरांचे वर्णन "लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या तर चिल्लर खुर्दा किती सांडला यांची गणतीच नाही" असे बखरीत आढळते...
या देदीप्यमान पराजयाचे वर्णन राम गणेश गडकरींनी (गोविंदाग्रज):-
कौरव पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती।
तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती ।। असे केले आहे.
'हिंदवी साम्राज्याच्या भाळावरची भळभळणारी जखम',असं पानिपतच्या युद्धाचं वर्णन केलं जातं... पानिपतमध्ये झालेला पराभव इतका दारुण होता, झालेले नुकसान इतके भयंकर होते की त्या पराभवाची आठवण वा उच्चारसुद्धा नकोसा वाटतो. 'पानिपत होणे' हा शब्दप्रयोग मराठी भाषेत सर्वनाश या अर्थाने रूढ झाला.
खुद्द अहमद अब्दालीनेच या युद्धाबाबत लिहून ठेवले आहे,
"दक्षिण्यांनी (हिंदूंनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धदिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या सैन्यावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. हिंदूंचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्यादिवशी आमचे रूस्तम आणि इस्किंदरासारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर हजर असते, तर त्यांनी हिंदूंचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालुन चावली असती. हिंदूंसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य!"