नायकी देवी वि. महंमद घोरी
महंमद घोरीला कायमचे नपुंसक करणाऱ्या नायकीदेवीची शौर्यगाथा
राणी नायकीदेवी सोळंकी -
गोव्याचे महाराज महामंडलेश्वर यांची मुलगी नायकीदेवी. कदंब वंशाचे हे छोटेसे राज्य व्यापारात अग्रेसर होते. नायकीदेवीचा विवाह गुजरातचे महाराज अजयपाल सोलंकी यांच्याशी झाला. मात्र चारच वर्षांनी अजयपाल यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा मूलराज ( द्वितीय ) हा खूप लहान होता. त्यांची मुलगी कुर्मादेवी ही तर पाळण्यातच होती. म्हणून नायकीदेवीने राज्यकारभार स्वतः करायचे ठरवले. इ.स.११७१ मध्ये नायकीदेवीने राज्यशकट हाती घेतला.
व्यापार करणाऱ्या घराण्याची ही राजकुमारी जनतेच्या आर्थिक सुबत्तेसाठी योजना आखू लागली. उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देत तिने व्यापार वाढवला. प्रजेवर पुत्रवत माया केली. म्हणूनच मोहम्मद घोरीचा सामना करण्यासाठी तिला सर्वांनी साथ दिली.
मिन्हाज इ सिराज हा घोरीचा दरबारी लेखक. त्याने मोहम्मद घोरीच्या भारतावरील स्वारीचे इत्थंभूत वर्णन लिहून ठेवले आहे. मुलतान मार्गे अन्हिलवाडावर हल्ला करण्यासाठी घोरी निघाला. अन्हिलवाडा म्हणजे सोळंकी घराण्याची, आपल्या नायकीदेवीची राजधानी! ' इस्लामची सेना ' असे वर्णन करून घोरीच्या आक्रमणाचा उद्देशच मिन्हाज इ सिराज याने स्पष्ट केला आहे. सिराज म्हणतो, " अन्हिलवाड्याचा राजा वयाने खूपच लहान होता. पण त्याच्या सैन्यात भरपूर हत्ती आणि शूर शिपाई होते. या लहान राजाची आई सैन्याचे नेतृत्व करत होती."
अफगाणिस्तानच्या गजनवी सुलतानचा पराभव करून घोरी गुजरात मध्ये आला होता. अन्हिलवाड्याचा भरभराटीला आलेला व्यापार त्याला दिसत होता. तिथले वैभव खुणावत होते. अमेरिकन इतिहास संशोधक टर्टियस शॅन्डलर यांच्या मते अन्हिलवाडा नगरी त्या काळातील दहा विशाल नगरींपैकी एक होती. तिथली लोकसंख्या किमान एक लाख असावी. अशा वैभवशाली नगरीचा शासक एक छोटा मुलगा होता. त्याची आई आपल्याला काय टक्कर देणार या विचाराने घोरी पुढे आला. त्याने नायकीदेवीकडे दूत पाठवला. " तुमच्या राज्यातल्या सर्व स्त्रिया आणि शाही खजिना आम्हाला द्या. आम्ही तुमच्या राज्यावर कधीही हल्ला करणार नाही. " मुहम्मद घोरीचा संदेश दूताने ऐकवला. थोडा विचार करून नायकीदेवीने त्याला होकार सांगितला. दूताने छावणीत परत जाऊन घोरीला ही आनंदाची बातमी दिली. घोरी अतिशय आनंदित झाला. सैनिकांना बहारदार जश्न करण्याचा त्याने आदेश दिला.
इकडे नायकीदेवी युद्धाच्या तयारीला लागली. गोव्याच्या कदंब घराण्याची राजकुमारी नायकीदेवी युद्धशास्त्र निपुण होती. लहानपणीच तिने घोडेस्वारी, नेमबाजी, तलवारबाजीमधे प्राविण्य मिळवले होते. युद्धाचे डावपेचही ती शिकली होती. वडिलांनी राज्यकारभाराचे ज्ञानही तिला दिले होते. हुशारीने राज्यशकट हाकणारी नायकीदेवी युद्धाला सज्ज झाली.
प्रथम तिने आजूबाजूच्या राजांना संदेश पाठवले. अफगाणिस्तानातील गझनवींना लोळवणारा घोरी भयंकर संहार करणार याची सर्वांनाच कल्पना होती. कारण इ.स. १०६० मधे म्हणजे शंभर वर्षांपूर्वी त्याच गझनीचा महमूद भारतावर चालून आला होता. त्याच गझनवींना हरवून घोरी पुढे आला होता. त्यामुळे कोणीही नायकीदेवीला मदत करायला पुढे आले नाही. प्रत्यक्ष पृथ्वीराज चौहान यांनी देखील नकार कळवला. मग आपल्या सोळंकी घराण्याच्या सामंतांकडे तिने मदत मागितली. सगळे जमीनदार, जहागीरदार आणि मांडलिक शासक त्वरित पुढे आले. नायकीदेवीने कौशल्याने व्यूहरचना केली. विचारपूर्वक योजना आखल्या. माउंट आबूच्या पायथ्याशी कयाद्रा या गावापाशी तिने घोरीचे सैन्य अडवले. घोरीचे अवाढव्य सैन्य त्या जंगलात सैरभैर झाले. हल्ला होणार नाही अशा भ्रमात आनंदोत्सव करणारा घोरी पार गोंधळून गेला.
डोंगर-दऱ्या, पायवाटा यांचा उपयोग करून, गनिमी काव्याचा प्रयोग करत नायकीदेवी मोहम्मद घोरीचा सामना करत होती. लहान मुलाला पोटावर बांधून नायकीदेवी रणांगणात लढत होती. घोरीच्या सैन्याला अरुंद वाटांमधे तिच्या हत्तींनी अक्षरशः चिरडून टाकले. घोरीच्या सैन्याची दाणादाण उडाली. मुलतान जिंकून घोरीला स्वतःच्या शौर्याचा गर्व झाला होता. त्याला युद्धासाठी आव्हान देऊन नायकीदेवी त्याच्या समोरच घोडा घेऊन गेली. तिच्या तलवारबाजीचे कसब सर्वांनाच थक्क करणारे होते. नायकीदेवीच्या संतापाचा उद्रेक झाला होता. आपल्या प्रजेतल्या महिलांची मागणी करणाऱ्या त्या नराधमाला संपवण्यासाठी ती दोन्ही हातांनी तलवारी चालवत होती. घोरीला वाचवण्यासाठी त्याचे सैनिक मधे आले. घोरीच्या पोटात तलवार खुपसण्यासाठी तिने वार केला. तेवढ्यात त्याच्या सैनिकाने घोरीच्या कमरेभोवती हात घालून त्याला मागे ओढले. दोघांचे घोडे खिंकाळले. नायकीदेवीचा वार चुकला. घोरीच्या पोटाऐवजी दोन्ही पायांच्या मधे तलवार खुपसली गेली. त्या अमानुष घोरीला कायमचे नपुंसक करणारा हा वार होता. घोरी मरेपर्यंत निपुत्रिक होता. निवडक अंगरक्षकांना घेऊन कयाद्राच्या लढाईतून चक्क पळून गेला तो!
दुःख, अपमान आणि लाजिरवाण्या जीवनाची धगधगती आग उरात घेऊन १४ वर्षे घोरी सैन्य जमवत राहिला, भारतावर पुन्हा आक्रमण करण्यासाठी! १४ वर्षांनी परत आलेल्या घोरीने पृथ्वीराज चौहानवर आक्रमण करून दिल्ली जिंकली. पण गुजरातकडे अजिबात फिरकला नाही इतकी नायकीदेवीची त्याला दहशत बसली होती.
कवी सोमेश्वर याने नायकीदेवीच्या घोरीशी झालेल्या या युद्धाचे वर्णन केले आहे. गुजरातच्या लोकसाहित्यात, मेरूतुंग या लेखकाच्या ' प्रबंध चिंतामणी ' या जैन ग्रंथामधे आणि चालुक्यांच्या शिलालेखांमधे नायकीदेवीच्या पराक्रमाचे उल्लेख येतात.
मोहम्मद घोरीचे आक्रमण, पृथ्वीराज चौहान यांचा त्याने केलेला पराभव वगैरे आपल्याला सांगितले जाते. पण त्या घोरीला भारतातील एका राणीने जबरदस्त टक्कर देऊन पळवून लावले होते. कायमचे नपुंसक केले होते, हे कुणीही सांगत नाही. इस्लामी आक्रमक जिंकले हेच सतत आपल्या मनावर बिंबवले गेले.