पानिपत लढाई प्रथम १
स्रोत: पेशवे गण (फेबु , व्हॅप)
मूळनाव: पांडूप्रस्थ
स्थळ: हरयाणा , कर्णाल जिल्हा ( दिल्लीच्या वायव्येस सु. ८५ किमी. वर दिल्ली-अंबाला हमरस्त्यावर )
बाबर वि. इब्राहीम लोदी
काळ: २१ एप्रिल १५२६
पात्र: बाबर व इब्राहीम लोदी यांमध्ये दिल्लीच्या तक्ताकरिता ( अधिकाराकरिता )
बाबरपर्यंत जे सुलतान झाले ते बहुतेक अफगाण होते, मोगल नव्हते. खल्जी (खिल्जी), तुघलक, सय्यद आणि लोदी या वंशांतील सर्व सुलतान भारतात आपले राज्य कायम टिकावे या प्रयत्नात होते.
यामुळे मोगलांच्या भारतावर होणाऱ्या स्वाऱ्यांना हे सुलतान सतत विरोध करीत आले.
बाबर हा तुर्क व मोगल या दोन रक्तांचा वाररसदार होता. त्याने अफगाणिस्तान व मध्य आशिया या दोन प्रदेशांत आपले राज्य स्थिर करण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यास म्हणावे तसे यश आले नाही. म्हणून त्याने आपले लक्ष भारताकडे वळविले. भारतात आपले राज्य स्थिर करण्याच्या उद्देशाने त्याने भारतावर पाच-सात स्वाऱ्या केल्या. त्या सर्व स्वाऱ्यांत त्यास उणेअधिक यश मिळत गेले. यामुळे भारतात राज्य स्थापण्याचा त्याने पक्का निश्चय केला. त्याची शेवटची स्वारी याच हेतूने झाली होती.
त्या वेळी भारतात लोदी घराण्यातील इब्राहीमचे राज्य चालू होते. या इब्राहीम लोदीला काही प्रतिस्पर्धी होते. त्यांपैकी एक त्याचा चुलता आलमखान लोदी व दुसरा पंजाबचा सुभेदार दौलतखान लोदी. या दोघांनीही बाबरास पत्र लिहून कळविले, की ‘आम्हास गादीवर बसविण्यास मदत केली, तर लोदी राजवटीच्या ताब्यात असलेल्या प्रदेशांपैकी काही प्रदेश आपणास देऊ व आपली अधिसत्ता मानू’. बाबर आपल्या हेतूच्या पूर्तीसाठी अशा संधीची वाटच पहात होता. ही पत्रे जाताच त्याने भारतावर स्वारी करण्याचे ठरवले.
तो आपले सैन्य घेऊन भारतात आला. या वेळी दौलतखान व त्याचा एक मुलगा दिलावरखान यांमध्ये वितुष्ट येऊन तो बाबरास मिळाला होता. बाबर भारतात आला असे पाहून इब्राहीमखान लोदी हा त्याच्याशी लढाई देण्याची तयारी करू लागला.
बाबर तोपर्यंत पानिपतच्या जवळ पोहोचला होता तेव्हा इब्राहीम लोदी हाही पानिपतजवळ बाबाराशी लढाई करण्याच्या उद्देशाने आला. दोघांचे सैन्य पानिपतजवळ तळ देऊन राहिले. सु. आठ दिवस किरकोळ चकमकीशिवाय लढाई अशी झाली नाही.
पण २१ एप्रिल १५२६ रोजी दोघांची पानिपतच्या मैदानावर मोठी लढाई झाली. या लढाईत इब्राहीमखानाच्या बाजूस एक लाख शिफाई होते, तर बाबारकडे सु. २५ हजार लोक होते असे म्हणतात. पण बाबराने या लढाईत आपल्या सैन्याची अशा रीतीने मांडणी केली की, लढाई सुरू होताच बाबरच्या सैन्याने इब्रहीमच्या सैन्याला पाठीमागून जाऊन घेरले. यामुळे इब्राहीम लोदीच्या सैन्यात गोंधळ उडाला. इब्राहीम शौर्याने लढला, तरी तो मारला गेला. पुढे त्याच्या सैन्याचा सर्वस्वी नाश होऊन बाबरास जय मिळाला.
एवंच आलमखान व दौलतखान दोघांच्याही तोंडांस पाने पुसली गेली...!!
पानिपत युद्ध द्वितीय २
स्रोत: पेशवे गण (फेबु , व्हॅप)
अकबर ( पालक बैरामखान) वि. हेमू (हीमू , हेमचंद्र)
काळ: ५ नोव्हेंबर १५५६
पात्र: अकबर ( पालक बैरामखान) व हेमू (हीमू , हेमचंद्र) यांमध्ये दिल्लीच्या तक्ताकरिता ( अधिकाराकरिता )
बाबरनंतर हुमायून उत्तर भारतात राज्य करीत असता शेरशाह सूरीच्या पुढे त्याचे काही एक न चालून त्याला इराणात आश्रय घ्यावा लागला पण तेथे तो स्वस्थ बसला नव्हता. हुमायूनचे लक्ष भारतातील घडामोडींवर होते.
१५५४ मध्ये शेरशाहचा मुलगा इस्लामशाह वारल्यानंतर त्याच्या वारसांत गादीविषयी भांडण सुरू झाले. या भांडणात सूरवंशाची राज्ययंत्रणा ढिली झाली आहे असे पाहून हुमायून अफगाणिस्तानमार्गे हिंदुस्थानात आला व त्याने १५५५ मध्ये दिल्ली सर केली पण तेथे त्याचा जम बसण्यापूर्वीच तो मरण पावला. यामुळे सूरवंशातील एक वारस मुहम्मद आदिल (१५५४-५६) याने उचल खाल्ली व त्याने चुनार येथे आपले लहानसे राज्य स्थापन केले.
त्या वेळी त्याच्या सहायकांतील हेमू नावाचा एक कर्तबगार हिंदू महत्पदावर चढला होता. त्याने दिल्ली हस्तगत केली तेव्हा त्यास वाटले की, आता आपण राजा झालो. त्याने आपल्या नावाची नाणीही पाडली होती, असे म्हणतात. या वेळी अकबर व त्याचा पालक बैरामखान जलंदर येथे असता त्यांस ही बातमी लागली तेव्हा ते दिल्ली जिंकण्याच्या उद्देशाने पानिपतजवळ आले.
हेमूस ही बातमी समजताच तोही आपल्या सैन्यासह पानिपतजवळ आला. हेमूपाशी १,५०० हत्ती व १ लाख सैन्य होते अशी वदंता आहे. अकबराजवळ त्या वेळी फक्त २० हजार सैन्य होते. अशा स्थितीत पानिपतच्या मैदानावर ५ नोव्हेंबर १५५६ रोजी दोन्ही सैन्यांची गाठ पडली. हेमू फार त्वेषाने लढला. अकबराचा पराभवच व्हावयाचा पण हेमूच्या डोळ्यास एक बाण लागला व तो पकडला गेला. अकबराने त्याचा शिरच्छेद केला. अकबराने ही लढाई जिंकली.