आदि शंकराचार्य

जन्मस्थळ: पूर्णानदीच्या तीरावर असणाऱ्या कालडी / कुडली गाव केरळ
जन्मवर्ष: कमीत कमी आजच्या (जानेवारी २०२४ ) पूर्वी २४०० वर्ष
संन्यास: ८ / ९ व्या वर्षी

कार्य: अद्वैत वेदांत तत्त्वज्ञान, पंचायतन पूजा पद्धती

स्रोत: [सुजीत भोगले आदि शंकराचार्य फेबु]((https://www.facebook.com/share/p/1DM34b4xRe/)) , 
[Jio Talks with Sri Abhinava Shankara Bharati MahaSwami](https://www.youtube.com/watch?v=cjZhdSDXqmQ)

जन्मकथा

केरळातील पूर्णानदीच्या तीरावर असणाऱ्या कालडी / कुडली गावात आर्याम्बा आणि शिवगुरू या दंपतीच्या पोटी शंकराचा वैशाख शुद्ध पंचमीच्या दिवशी जन्म झाला. शिवगुरू आणि आर्याम्बा यांना विवाहाच्या पश्चात सुमारे एक तप अपत्यप्राप्ती झाली नव्हती. शंकराचे आणि ललिता त्रिपुरसुंदरीचे निस्सीम भक्त असणारे शिवगुरू आणि आर्याम्बा यांनी कठोर तपस्या केली. त्यांना शंकराने स्वप्नात दृष्टांत दिला आणि त्याच्या कृपाप्रसादाने त्यांना अपत्यप्राप्ती झाली म्हणून मुलाचे नाव शंकर ठेवले.

आपल्या धर्माची अशी मान्यता आहे की ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते, त्या त्या वेळी ईश्वर अवतार धारण करतो आणि धर्माला आलेली ग्लानी दूर करतो. या संदर्भात श्री विष्णूंचे दशावतार सर्वांनाच माहिती आहेत. परंतु आदि शंकराचार्य हा ज्ञानघन शिवाने घेतलेला अवतार आहे, असं मानलं जातं.

वयाच्या ४ वर्षी त्यांची मुंज झाली, ८ वर्षापर्यंत त्यांनी संपूर्ण वेदांचं अध्ययन पूर्ण केले, ९ वर्षी वेदशास्त्रसंपन्न होऊन त्यांनी शिक्षण देण्यास प्रारंभ केला.

कार्य

१. हिंदू धर्माला आलेली ग्लानी दूर करण्याचे कार्य
२. ग्रंथांची रचना
३. देशाटन - मंदिरे, धर्म, गुरुकुल पुनर्रचना, पुनर्निर्माण
 

संपूर्ण वैदिक विचारसरणीचा पाया चतुःआश्रम हा आहे. हे चतुःआश्रम म्हणजे ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यास. या चार पैकी संन्यास या आश्रमालाच प्रमाण मानून बौद्ध मतांनी स्वतःच्या धर्माचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रारंभ केला होता.

वेदांमध्ये यज्ञाचा उल्लेख अत्यंत गौरवपूर्ण तऱ्हेने करण्यात आला आहे. यज्ञाच्या द्वारे तुम्ही ईश्वरी शक्तीला हविर्द्रव्य देऊ शकता, त्या शक्तींच्या कृपाप्रसादाच्या रूपाने तुम्हाला तुमचे मनोवांछित प्राप्त होऊ शकते, हा विचार मांडला गेला. परंतु कालांतराने या संकल्पनेने विकृत स्वरूप धारण केले, यज्ञ हेच प्रत्येक गोष्टीसाठी प्रमाण होऊन बसले. नित्य वेगवेगळ्या प्रकारे, विस्तृत स्वरुपात यज्ञ करणे हे सामान्य जनांना शक्य होईनासे झाले, इतकेच काय पण धनिक व राजे-महाराजे यांनाही ते शक्य होईना. यज्ञाचे स्तोम माजू लागले, व तात्विक पातळीवर धर्माला ग्लानी यायला लागली होती, आणि लोक धर्म पालनाबद्दल उदासीन व्हायला लागले होते.

याच कालखंडामध्ये पराकोटीच्या अहिंसेचा पुरस्कार करणाऱ्या जैन मत प्रवाहाचा आणि संपूर्ण विश्व किंवा संसार हा असार आहे, दुखःमय आहे, त्यामुळे संसाराचा त्याग करा, संन्यास धारण करा, व मोक्षाचे अधिकारी व्हा, या पद्धतीच्या पराकोटीची नकारात्मक विचारसरणी बाळगणाऱ्या बौद्ध धम्माचा उदय झाला होता. दुर्दैवाने या दोन्हीही विचारसरणींना राजाश्रय मिळण्यास सुरुवात झाली होती, व्यापक स्वरुपात राजाश्रय मिळाल्यानंतर या दोन्हीही धर्मांनी, विचारांनी आपले मूळ स्वरूप दाखवण्यास सुरुवात केली.

चतु:आश्रमांपैकी, संन्यास या आश्रमालाच प्रमाण मानून बौद्ध मतांनी स्वतःच्या धर्माचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रारंभ केला होता.

बुद्ध हे लोकांना संन्यास घेण्यासाठी प्रेरित करत असत. बुद्धांनी संन्यासाला ज्या व्यापक पातळीवर आणायचा प्रयत्न केला, त्यातून समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नकारात्मकता निर्माण व्हायला लागली. समाजातील तरुण – तरुणी हे बौध्द मताच्या प्रभावाखाली संन्यास स्वीकारत. परंतु संन्यास स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या संपूर्ण वैषयिक वासना या शून्यत्वाला गेल्या पाहिजेत हा दंडकसुद्धा अव्हेरला जाऊ लागला. याचा परिणाम म्हणून बौद्ध विहारांमध्ये, बौद्ध मठांमध्ये तरुण – तरुणींमधील अनाचार खूप मोठ्या प्रमाणात बोकाळले होते. तरुण – तरुणींनी संन्यास घेतल्यामुळे समाजाचं देखील संतुलन बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली होती.

दुसरीकडे, आपल्या सनातन भारतीय संस्कृतीमध्ये नेहमीच पाच उपासना मार्ग सांगितले आहेत.

  • पहिला निसर्ग-उपासकांचा होता; वेद प्रकट होण्याची प्रक्रियाच निसर्ग उपासनेमुळे झाली आहे.
  • दुसरा उपासना मार्ग म्हणजे शुद्ध ज्ञानप्राप्ती हा जीवनाचा हेतू बाळगणाऱ्यांचा, त्यांच्यासाठी शिव किंवा रुद्र ही उपास्यदेवता होती.
  • तिसरा होता शक्तीच्या उपासकांचा, जे शक्ती किंवा स्त्री तत्वाला प्रधान मानत असत.
  • चौथा मार्ग होता पालनकर्ता विष्णू या स्वरूपामध्ये उपासना करणाऱ्यांचा.
  • आणि पाचवा उपासनामार्ग होता लौकिक जगातील ज्ञानाचं आपल्या जीवनामध्ये गणेश रुपात पालन करणाऱ्यांचा.

या पाचही विचारसरणीचे लोक सुद्धा यज्ञच करत असत, आणि यज्ञातूनच आपल्या उपास्य देवतेला हवि प्रदान करत असत. परंतु कालांतराने या पाचही उपासना पद्धतींचे पालन करणाऱ्यांमध्ये देखील आपसात संघर्ष निर्माण झाला, आणि प्रत्येकाला केवळ आपलीच उपासना पद्धती श्रेष्ठ वाटायला लागली. यातून या सर्वांमध्ये वाद, भांडणं, काही ठिकाणी युद्ध देखील झाल्याचे दाखले आहेत. या पाच संप्रदायांमधील परस्पर वादंगांच्यामुळे सुद्धा सामान्य लोक धर्माच्या प्रती अधिक उदासीन व्हायला लागले होते.

सनातन धर्माचंच पालन करणाऱ्या पाचही मुख्य संप्रदायांमध्ये जो मत मतांतराचा गलबला निर्माण झालेला होता, तो आधी शांत करणं हे सगळ्यात जास्त आवश्यक होतं. आचार्यांनी या सगळ्या मंडळींशी, म्हणजे द्वैत प्रमाण मानणाऱ्या मंडळींशी शास्त्रार्थ करून त्यामध्ये त्यांना पराभूत केलं आणि सनातन धर्माचा शुद्ध विचार अर्थात अद्वैती वेदांत स्विकारायला लावला. आचार्यांनी बौद्ध आणि जैन मतांचाही शास्त्रार्थामध्ये पराभव केला, आणि त्या धर्मांना देखील स्वतःच्या मर्यादांची जाणीव करून दिली. आचार्यांनी त्यांना सिद्ध करून दाखवलं की तुम्ही वेदांतीलच निवडक विचार मांडता आहात, थोडक्यात मूलतः तुम्ही वेद विचारच परंतु वेगळ्या दृष्टीकोनातून मांडता आहात, मात्र तुम्ही त्याला विकृत किंवा नकारात्मक पद्धतीने मांडत आहात. आचार्यांचा हा तर्क तत्कालीन एकही जैन किंवा बौद्ध विद्वान खोडून काढू शकला नाही; आचार्यांच्या दिग्विजयामध्ये त्यांनाही पराभूत व्हावं लागलं.

देव पंचायतन

संपूर्ण समाजाला एक करणे, चैतन्यपूर्ण करणे, मत मतांतराचा गलबला एकदाच आणि कायमचा शांत करणे हे आचार्यांच्या पुढे अवशिष्ट राहिलेले मुख्य कार्य होते. हे कार्य करण्यासाठी आचार्यांनी देव पंचायतन पूजा पद्धतीचा पाया घातला.

तत्कालीन समाजाचं नैतिकतेच्या पातळीवर जे अधःपतन झालं होतं, ज्या तऱ्हेची भौतिकता त्या समाजामध्ये बोकाळली होती त्याचे शमन करायचे असेल तर त्यांना मूर्तीपूजा देणे क्रमप्राप्त होते; अशी एक सामायिक उपासना पद्धती देणे आवश्यक होते ज्यामुळे हिंदू धर्माच्या पाचही विचारसरणींमध्ये परस्पर सामंजस्य, ऐक्य व स्नेहभाव वृद्धिंगत होईल, आणि महत्वाचं म्हणजे आपल्या सर्वांचा धर्म एकच आहे ही भावना वाढीस लागेल. या पद्धतीचं एकत्रीकरण साधण्यासाठी आचार्यांनी देव पंचायतन पूजा पद्धतीचा वापर केला.

ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये जी देवता मुख्य असेल, मग ती ईश्वरी शक्ती कुलस्वामिनी असेल किंवा कुलदैवत असेल, त्याला तुम्ही मुख्य उपास्य देव माना, अन्य चार ईश्वरी तत्वांना गौण उपास्य माना, परंतु या पाचांचे एकत्रीकरण म्हणजे देव पंचायतन, हा विचार आचार्यांनी रुजवला.

देव पंचायतन प्रक्रिया मग जर एखाद्या घरामध्ये शक्ती उपासना रूढ असेल, तर त्यांनी देवीचं एक रूप अथवा आपल्या कुलस्वामिनीचं सगुण मूर्त रूप हे पूजेमध्ये मध्यभागी ठेवावं, अन्य चार कोपऱ्यांमध्ये शिवतत्वाचं एक प्रतीक अर्थात शिवलिंग, गणेश तत्त्वाचं प्रतीक म्हणून गणपतीची मूर्ती, विष्णूच्या रूपाचं प्रतीक म्हणून विष्णूच्या दशावतारांपैकी कोणीही किंवा विष्णूची मूर्ती, आणि निसर्ग उपासकांचं प्रतीक म्हणून सूर्यप्रतिमा – अशी पाच तत्व नित्य उपासनेसाठी आपल्या पूजेमध्ये ठेवा असं आचार्यांनी सांगितलं.

या देव पंचायतन पूजा पद्धतीचा सगळ्यात मोठा फायदा असा झाला की शैव, शाक्त, सौर, गाणपत्य आणि वैष्णव या पाचही संप्रदायांच्या मध्ये मतैक्य निर्माण झालं. आपल्या पाचांचीही उपास्यदेवता जरी भिन्न असली, तरी आपण सर्व या पाचही देवांची पूजा करतो या अर्थाने आपण सर्वजण एक आहोत, हा भाव समाजामध्ये रुजवण्यात आचार्य यशस्वी ठरले.